---Advertisement---
अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काही नागरिक आणि नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
महिन्याला होणारी ही सभा शहराच्या विकासासाठी महत्त्वाची मानली जाते. विविध विकासकामांना मंजुरी देणे, नागरिकांच्या तक्रारींवर निर्णय घेणे तसेच प्रशासनाशी संबंधित बाबींचा निपटारा करण्यासाठी या बैठकीत चर्चा होते. मात्र मार्चमध्ये सभा न झाल्याने अनेक प्रस्ताव आणि तातडीचे निर्णय अडकून पडल्याची माहिती देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात महात्मा जोतिराव फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठीही या सभेची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतही निर्णय होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने या बाबतीत निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत संबंधितांनी लवकरात लवकर सभा घेऊन प्रलंबित विषयांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना विरोधी नगरसेवक विजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुस्ताक खाटीक, नगरसेवक सचिन पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या निवेदनावर माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, स्वप्ना पाटील, कविता राजपूत, गोपी कासार, सचिन पाटील, भारत ललवाणी, देवेंद्र कांबळे, अफसाना खाटीक, राजू भाऊ फाफोरेकर, शोभाबाई गाढे आणि प्रा. योगिता कापडणेकर यांसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









