---Advertisement---
जळगाव : आरोग्यदूत आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सहायता उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत यावल, पाल तालुक्यातील एकूण २६ रुग्णांवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात आली. याकामी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपले योगदान दिले, ज्यात प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयुरी राठोड, डॉ. स्वाती असोले, डॉ. मयुरेश डोंगरे, सोबिया अन्सारी, डॉ. अनंत लांडगे या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यांना अधिपरिचारिका सुनीता वक्ते, मयुरी हिवर्डे, लालसिंग पावरा आणि उमेश वेल्हाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या संपूर्ण मोहिमेचे नियोजन मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि त्यांना दृष्टी मिळावी, या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील रुग्णांसाठी विशेष पुढाकार घेतला होता.
या शस्त्रक्रियेमुळे २६ रुग्णांच्या जीवनातील अंधकार दूर झाला असून, रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल जावळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून चालणाऱ्या वैद्यकीय कक्षाचे आभार मानले आहेत.









