---Advertisement---
उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हटिया आणि संतरागाछी या मार्गांवर अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांमुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
एलटीटी ते हटिया साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ०८६१०) ही २२ एप्रिल ते १७ जूनदरम्यान दर बुधवारी पहाटे ५ वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता हटिया येथे पोहोचेल. तसेच हटिया ते एलटीटी गाडी (क्रमांक ०८६०९) ही २० एप्रिल ते १५ जूनदरम्यान दर सोमवारी दुपारी ४.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४० वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
याशिवाय, एलटीटी ते संतरागाछी साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ०१००१) ही २१ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता सुटणार आहे. तर संतरागाछी ते एलटीटी (क्रमांक ०१००२) गाडी २३ एप्रिल ते १६ जुलैदरम्यान दर गुरुवारी दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता मुंबईत पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, राऊरकेला, टाटानगर, खरगपूर आदी स्थानकांवर थांबे असणार आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांमुळे विशेषतः खान्देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.









