---Advertisement---
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस स्टेशन यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या प्रकाश कमलाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) याला अटक केली. दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नियोजनबद्ध कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही याच नशिराबाद परिसरात अशाच प्रकारे एक आरोपी गावठी कट्टा सह अटकेत घेण्यात आला होता. त्यामुळे सलग अशा घटना घडत असल्याने परिसरात बेकायदेशीर शस्त्रांची हालचाल सुरू असल्याची चर्चा आहे. एकीकडे पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असले तरी दुसरीकडे वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करून बेकायदेशीर शस्त्रविक्रीचा मागोवा घेण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारीवर कायमस्वरूपी आळा बसवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.









