---Advertisement---
अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील जी. एस. हायस्कूलच्या आवारात एक कबुतर जखमी अवस्थेत आढळून आले असून त्यामध्ये संसर्गजन्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जी. एस. चव्हाण यांना शाळेच्या परिसरात हे कबुतर पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी करुणा शिक्षक डी. एन. पालवे यांना माहिती दिली. दोघांनी मिळून तत्काळ त्या कबुतराला अमळनेर येथील शासकीय पशु रुग्णालयात दाखल केले.
तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. कुंवर व ड्रेसर एम. एन. सोनवणे यांनी प्राथमिक उपचार केले. तपासणीदरम्यान कबुतराच्या चोची व डोक्यावर गाठीसारखे फोड आढळून आले. हे लक्षण ‘पक्षी देवी’ (फोलपॉक्स) या विषाणूजन्य आजाराशी संबंधित असू शकते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
सदर आजार प्रामुख्याने उन्हाळ्यात, अतिउष्णतेमुळे तसेच वातावरणातील अचानक बदलांमुळे पसरतो. हा आजार पक्षांकडून पक्षांना संसर्गित होतो. मात्र मृत्यूदर कमी असला तरी संसर्गाचा वेग जास्त असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजारी पक्ष्यांना वेगळे ठेवल्यास ते तीन ते चार दिवसांत बरे होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी जखमी किंवा आजारी पक्ष्यांना हाताळताना काळजी घ्यावी, तसेच अशा पक्ष्यांपासून इतर पक्ष्यांना दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी सावलीत पाण्याची व्यवस्था करावी, असेही शासकीय पशु रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.









