---Advertisement---
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील केळी बागेजवळ आढळून आलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघां भावांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी सकाळी अंतुर्ली शिवारातील अशोक काशिनाथ पाटील यांच्या शेताजवळ एक मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष आडसुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे व त्यांच्या पथकसने घटनास्थळी घेत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पंचनामा करून तपासाला सुरुवात केली होती. प्राथमिक तपासात हा मृतदेह प्रमोद प्रल्हाद तायडे (वय-४२, रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते.
रुग्णालयात न नेता शेतात टाकला मृतदेह
अधिक चौकशीत, १६ एप्रिल रोजी रात्री अजय नायके व प्रमोद तायडे यांनी एकत्र मद्यपान केले. त्यानंतर नाचनखेडा (जि. बुरहानपूर, म.प्र.) येथे जात असताना सुंदर पातोंडी परिसरात रस्त्याच्या कामामुळे तयार झालेल्या उंचवट्यावर मोटारसायकलचा तोल जाऊन प्रमोद तायडे मागे पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, अपघातानंतर अजय नायके यांनी तायडे यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेता आपल्या भावाला बोलावून घेत दोघांनी मिळून जखमी प्रमोदला घटनास्थळावरून हलवून अंतुर्ली-नरवेल मार्गावरील शेतात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे प्रमोदचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बनावट माहिती पसरवण्याचा प्रयत्न ?
दरम्यान, प्रमोद धनगर याला सोबत घेऊन पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने घटनास्थळी जाऊन मृतदेह आढळत्याची बनावट माहिती पसरवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी ईश्वर भगवान तायडे (रा. नरवेल) यांच्या फिर्यादीवरून अजय भिका नायके व अमृत भिका नायके यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहेत.









