---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि अनुपस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत अनेक अधिकारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अधिकारी नेमके कुठे आहेत, याची स्पष्ट माहिती कर्मचाऱ्यांकडून दिली जात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. “साहेब बाहेर गेले आहेत”, “येत आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः पुरवठा निरीक्षक यांच्या हालचालींची नोंद ठेवणारे रजिस्टर पाहण्याची मागणी काही नागरिकांनी केली असता संबंधित रजिस्टर दाखवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. हालचाल रजिस्टरमध्ये अधिकाऱ्यांनी नोंद केली आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.
याशिवाय, काही कर्मचारी अधिकाऱ्यांना मोबाईलवरून गुपचूप माहिती देत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दररोज तहसील कार्यालयात रेशन कार्ड, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र आणि इतर विविध शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा अधिकारी गोडाऊनकडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिक भर उन्हात तिकडे धाव घेतात, पण तिथेही अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.









