---Advertisement---
भुसावळ शहरात एका २० वर्षीय तरुणीवर ब्लॅकमेलिंग, अत्याचार आणि जबरदस्ती धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी असून ती भुसावळ येथे आपल्या आजी-आजोबांकडे राहत होती. आरोपीने मैत्रीच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित तरुणी दोन वर्षांपूर्वी भुसावळ येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. याच काळात तिची ओळख नविल शेख कासम शेख या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने तिला भुसावळमधील एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले. यावेळी त्याने तिच्या नकळत काही फोटो मोबाईलमध्ये काढल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तक्रारीनुसार, आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच “माझे म्हणणे मान्य केले नाही तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन आणि कुटुंबाला जिवे मारून टाकीन,” अशी धमकीही दिली जात होती.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने तरुणीला अडवून जबरदस्तीने एका ठिकाणी नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपनगर परिसरातील एका खोलीत तिला ठेवण्यात आले. तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या एका मौलानाकडून तिच्यावर कलमा पठण करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भीतीपोटी तिने कलमा पठण केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा जबरदस्ती निकाह लावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, निकाहानंतर आरोपीने पीडितेला सुंदरनगर परिसरातील एका खोलीत तब्बल आठ दिवस डांबून ठेवले होते. या काळात तिच्यावर बुरखा घालण्याचा, नमाज पठण करण्याचा तसेच धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात येत होता. विरोध केल्यावर तिच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचाही आरोप आहे.
तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. सुरुवातीला भीतीमुळे पीडितेने पोलिसांना काहीही माहिती दिली नाही. मात्र सामाजिक संघटनांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर तिने संपूर्ण प्रकार उघड करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मध्य प्रदेशातील सिवनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी आरोपी नविल शेख याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, जबरदस्ती धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









