---Advertisement---
भुसावळ शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, भाजप गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीत अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले असून शहरातील अडीच लाख नागरिकांच्या आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाहणीदरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले दिसून आले. तसेच केंद्राच्या परिसरात कबूतरांसह पक्ष्यांच्या विष्टेमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत असून नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करून नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात सध्या केवळ आठ दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. तळातील पाणी उचलावे लागत असल्याने शहरात गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यातच जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशा प्रमाणात प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचेही उघड झाले. १९९१ मध्ये ३५ कर्मचारी असलेल्या विभागात आता केवळ १० कर्मचारी कार्यरत आहेत. वाढती लोकसंख्या आणि अपुरी मनुष्यबळ यामुळे व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने त्यांनी असहकार सुरू केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
नगरसेवक युवराज लोणारी यांनी शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त स्टोरेज वॉटर टँक उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, हतनूर धरणातून सोडण्यात आलेले पाणी काही दिवसांत बंधाऱ्यात पोहोचण्याची शक्यता असली तरी तोपर्यंत नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









