---Advertisement---
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना जळगाव जिल्ह्यातही विधानपरिषदेच्या जागेसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी इच्छुकांची चाचपणी सुरू असून जळगाव मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचाली वेगाने सुरू असून शिवसेना शिंदे गटाने किमान पाच जागांवर दावा केला आहे. त्यात जळगावच्या जागेकडे विशेष लक्ष लागले असून पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. प्रतापराव पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक नेत्यांनी मुंबईत आणि जिल्ह्यात लॉबिंग सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांचा प्रभाव लक्षात घेता त्यांच्या गटाकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील इतर मतदारसंघांमध्येही संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. जळगावमधून गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरु असून ठाणे-पालघरमधून माजी आमदार रवींद्र फाटक यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. तर हिंगोली-परभणीमधून अभिमन्यू खोतकर आणि विप्लव बजोरिया यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघासाठी राजेंद्र जंचाळ आणि बाजीराव चव्हाण यांच्यात स्पर्धा असल्याचे दिसत आहे. नाशिकमध्ये माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी हे इच्छुकांमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे. रायगडमध्ये भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावालाही पक्षांतर्गत पाठबळ मिळत असल्याचे समजते.









