फेसबुकवर प्रेमाचं जाळं; १४० हून अधिक तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध, त्यांच्या नावावर कर्जही घेतलं, मग्…..

---Advertisement---

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण करत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील फसवणुकीचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आदर्श म्हात्रे हा पनवेल परिसरातील रहिवासी असून तो फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणींशी ओळख वाढवत होता. सुरुवातीला मैत्री, त्यानंतर प्रेमसंबंध आणि लग्नाची आश्वासने देत तो संबंधित महिलांचा विश्वास जिंकत असे. विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपी महिलांच्या नावावर विविध बँकांमधून मोठ्या रकमेची कर्जे काढून फरार होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस तपासादरम्यान आरोपीने १४० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असल्याचेही समजते.या प्रकरणात आतापर्यंत ११ महिलांनी पुढे येत अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीमुळे अनेक महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाची बाब म्हणजे आरोपीविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. नवी मुंबई पोलिसांनी पूर्वी त्याला अटक केली होती. माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीने धाडस दाखवत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.या घटनेनंतर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवताना तसेच आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आरोपीकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---