---Advertisement---
खासगी प्लंबर व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पाणीचोरीचा ठपका…
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शासनाच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून अवैधरित्या पाणी चोरी केल्याप्रकरणी अखेर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या लेखी आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भाग-५ सीसीटीएनएस क्रमांक 262/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5), 62, 223 तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी म्हणून बारकू कृष्णा सोनवणे (वय 54, सुपरवायझर, गांधली पंप हाऊस व जलशुद्धीकरण केंद्र, मुंदडा सिटी, अमळनेर) यांनी तक्रार दिली आहे. तर आरोपींमध्ये जावेद कमरुद्दीन शेख (खासगी प्लंबर), कासरीन शेख उर्फ दादा (नगरपरिषद कर्मचारी, मेहतर कॉलनी, अमळनेर), यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, दि. 06 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजेच्या सुमारास गांधली जलशुद्धीकरण केंद्र परिसरात फिर्यादी कर्तव्यावर असताना जलशुद्धीकरण टाकीच्या मुख्य आउटलेट पाइपलाईनजवळ शासनाच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होत असून पाणी चोरी करून गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात खासगी प्लंबर जावेद शेख आणि नगरपरिषदेचा कर्मचारी कासरीन शेख हे संगनमताने पाणीचोरी करत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. नगरपरिषदेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत थेट छेडछाड करून शासनाच्या पाणीपुरवठ्याला अडथळा निर्माण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दि. 26 मे 2026 रोजी आदेश काढून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यास अधिकृत परवानगी दिली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
याचबरोबर, मुख्याधिकारी यांनी गांधली जलशुद्धीकरण केंद्रात नगरपरिषदेचे कर्मचारी कार्यरत असल्याचे स्पष्ट करणारे पत्रही दिले असल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध पूर्वीच आदेश देण्यात आले होते, मात्र त्या आदेशाचे पालन न झाल्याने आणि बेकायदेशीररित्या पाणीपुरवठा सुरू ठेवल्याने प्रकरण अधिक गंभीर बनल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गणेश वसंत पाटील (PBMH79935) करीत आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील या धक्कादायक प्रकारामुळे शहरात एकच चर्चा रंगली असून, या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









