Devendra Fadnavis: “कांदा कापल्यावरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, ते आंदोलन करतायत”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट प्रहार, दिल्लीत उद्या मोठी बैठक!

---Advertisement---

 

​मुंबई: “केंद्र सरकारने कालच कांदा खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून जवळपास १५ रुपये केला आहे. तरीही काही लोक या मुद्द्यावर विनाकारण राजकारण करत आहेत. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, अशी ही मंडळी आज राजकीय आंदोलनं करत आहेत,” अशा कडक शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
​राज्यात सध्या सुरू असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सविस्तर भूमिका मांडली. तसेच, कांदा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उद्या (बुधवारी) संध्याकाळी दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या दरात ३.५० रुपयांची वाढ केली असून आता हा दर प्रति किलो जवळपास १५ रुपयांवर पोहोचला आहे. केंद्राने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी देखील सुरू केली आहे.
“आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उद्या संध्याकाळी दिल्लीत विशेष बैठक होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार सातत्याने चर्चा करत असून आमचे सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत संवेदनशील आहे,” असे फडणवीस म्हणाले.
“आमच्या सरकारने १५ रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय घेतला, विरोधकांनी त्यांच्या काळात कधी असा निर्णय घेतला होता का, ते आधी दाखवावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.


इराण-अमेरिका युद्धाचा भारतात परिणाम; पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावर मुख्यमंत्री म्हणाले…
​सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा थेट फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, आज सीएनजीचे दरही वधारले आहेत. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
​यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्यात पेट्रोल-डिझेलच्या मागणीत अचानक ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये काही ठिकाणी साठेबाजी (Hoarding) आणि अनधिकृत व्यावसायिक वापराचा संशय आहे. प्रशासन यावर बारीक लक्ष ठेवून असून साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” तत्पूर्वी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात पुढील एक महिना पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते.


आमदार रोहित पवार सरकारवर आक्रमक!
​दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कांदा प्रश्नावरून नाशिकच्या चांदवड आणि लासलगाव भागात शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि शेतकरी संघटनांना एकत्र करत रोहित पवारांनी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.


​रोहित पवार काय म्हणाले?
​”आज शेतकरी आपल्या हक्कासाठी एकत्र आला आहे. बाजारपेठेत कांद्याला अवघा ५ ते ६ रुपये भाव मिळत आहे, जो अत्यंत अन्यायकारक आहे. कांद्याचा उत्पादन खर्चच प्रति किलो १८ रुपये येतोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.”
​आता एकीकडे विरोधकांचे आंदोलन तीव्र होत असताना आणि दुसरीकडे उद्या दिल्लीत कांदा प्रश्नावर महत्त्वाची बैठक होत असताना, केंद्र आणि राज्य सरकार यातून शेतकऱ्यांसाठी काय ठोस तोडगा काढणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---