---Advertisement---
जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोकड आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव शहरातील रायसोनी नगरातील रहिवासी पंकज भावसार (वय ४१) हे आपल्या कुटुंबीयांसह १५ ते १८ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाइकांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर सलग तीन दिवस बंद होते.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून सुमारे ४० हजार रुपयांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.
भावसार कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.









