---Advertisement---
रावेर तालुक्यातील निंभोरा बु. ग्रामपंचायतीतील गेल्या पाच वर्षांतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निंभोरा गाव सेवा समितीने केलेल्या तक्रारीवरून तालुकास्तरावरील सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे.
सोमवारी दिवसभर चौकशी पथकाने तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानुसार पुढील चौकशीची दिशा निश्चित करण्यात आली.
निंभोरा ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत निकृष्ट दर्जाच्या डस्टबिन खरेदीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षांतील सर्व विकासकामांची सखोल चौकशी करण्यात यावी, असा ठराव ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला होता. मात्र, त्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने ५ मार्च रोजी निंभोरा गाव सेवा समितीचे प्रमुख संयोजक तथा माजी उपसरपंच विवेक ठाकरे आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत ठिय्या आंदोलन केले होते.
या आंदोलनानंतर रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी पथकात बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. पी. इंगळे, कनिष्ठ अभियंता अतुल चौधरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता आर. पी. गिरी, कनिष्ठ अभियंता एस. के. चोपडे तसेच विस्तार अधिकारी वाय. आर. अढागळे आणि पी. बी. शिंदे यांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान तक्रारदार कैलास चौधरी यांनी ग्रामसभेच्या ठरावांचे इतिवृत्त वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार केली. तसेच चौदावा आणि पंधरावा वित्त आयोग, ग्रामनिधी, आमदार-खासदार निधी तसेच विविध योजनांतून झालेल्या सर्व विकासकामांची प्रशासकीय मान्यता, एमबी रेकॉर्ड, अदा केलेली बिले आणि कंत्राटदारांकडून काम हस्तांतरणासंदर्भातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
चौकशी समितीने संबंधित कागदपत्रे आठवडाभरात उपलब्ध करून देण्याची मुदत दिली असून त्यानंतर पुढील टप्प्यातील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, टेंडरनुसार पुरवठा न करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीकडील डस्टबिन परत पाठवून नव्याने खरेदी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी चौकशी समितीसमोर केली आहे.









