---Advertisement---
पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संचालक नीलकंठ पाटील यांचे संचालकपद बेकायदेशीररित्या रद्द करण्याचा प्रयत्न सभापती आणि सचिवांनी केल्याचा आरोप करण्यात आला असून सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सहनिबंधकांनी १३ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशात नीलकंठ पाटील यांचे संचालकपद कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांना पदावर कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशानंतरही बाजार समिती प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आरोप नीलकंठ पाटील आणि संचालक सतीश शिंदे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राजकीय आकस आणि मनमानी कारभारातून नीलकंठ पाटील यांना अपात्र ठरवण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सतीश शिंदे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर बाजार समितीचा निर्णय बेकायदेशीर ठरवत नीलकंठ पाटील यांचे संचालकपद बहाल करण्यात आले.
मात्र, आदेश होऊन अडीच महिने उलटल्यानंतरही त्यांना मासिक व विशेष सभांचे अजेंडे दिले जात नसल्याचा तसेच कामकाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार शासकीय आदेशाचा थेट अवमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“बाजार समिती ही कोणाची खासगी मालमत्ता नसून शेतकऱ्यांची संस्था आहे. कायद्याचे पालन झाले नाही तर सभापती आणि सचिवांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
गिरणाई नागरी पतसंस्था येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संचालक उद्धव मराठे, राहुल संघवी तसेच प्रशांत पवार उपस्थित होते.









