---Advertisement---
दिल्लीत एनडीएची बैठक, पण चर्चेत एकनाथ शिंदे; अमित शाहांच्या शेजारी स्थान मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण
दिल्लीत बैठक मात्र चर्चा महाराष्टाच्या गल्लीत; दिल्लीत एनडीएची बैठकीत एकनाथ शिंदेना अमित शाहांच्या शेजारी स्थान मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला देशभरातील एनडीएच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठकीत सहभाग घेतला. मात्र, बैठकीनंतर सर्वाधिक चर्चा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीची आणि त्यांना दिल्ली मिळालेल्या स्थानाची झाली.
बैठकीदरम्यान तसेच फोटोसेशनमध्ये एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी स्थान मिळाले होते. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्रातही याबाबत विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. एनडीएमधील शिंदे यांचे महत्त्व वाढत असल्याचे बोलले जात आहे. फोटोसेशनमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शेजारी उभ्या असल्याचेही दिसून आले.
एनडीएच्या बैठकीतील काही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यातील नेत्यांच्या आसनव्यवस्थेवर आणि स्थानावर राजकीय विश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः अमित शाह यांच्या शेजारी एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरत आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.









