पारोळा पोलिसांची धडक कारवाई: पिंपरखेड मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या २४ तासांत गजाआड; चोरीचा मुद्देमाल जप्त…!

---Advertisement---

 

पारोळा तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारोती मंदिरात झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात पारोळा पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हिरापूर येथील एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक ८ जून रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उत्रड शिवार परिसरातील पिंपरखेड मारोती मंदिरात एक अनोळखी इसम आला होता.  मंदिरात काही वेळ थांबून व देवाचे दर्शन घेऊन तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी  आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर) यांनी नेहमीप्रमाणे मंदिर बंद केले आणि ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ९ जून रोजी सकाळी ५:३० वाजता पुजारी नेहमीप्रमाणे मंदिराची साफसफाई करण्यासाठी आले असता, त्यांना मारोती मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानातील चांदीची मासोळी गायब असल्याचे दिसून आले. मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली पुजाऱ्यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरट्याने मंदिरातून ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यात चांदीचा मुकुट वजन ५०० ग्रॅम (किंमत अंदाजे ५०,००० रुपये), चांदीची मासोळी (कानातली) वजन १५० ग्रॅम (किंमत अंदाजे १५,००० रुपये) असा एकूण ६५,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक  योगेश महाजन यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करत असताना आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय हिरापूर (ता. पारोळा) येथील हिरालाल अरुण पाटील याच्यावर गेला.

पोलिसांनी संशयित हिरालाल पाटील याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली ८ जूनच्या रात्री पिंपरखेड मारोती मंदिरातील चांदीचा मुकुट आणि मासोळी आपणच चोरल्याचे त्याने मान्य केले. पोलिसांनी आरोपीच्या हिरापूर येथील राहत्या घरातून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल सुखरूप जप्त केला असून त्याला अटक केली आहे.  या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास साळुंखे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  ही यशस्वी कारवाई सपोनि योगेश महाजन, पोहेका कैलास साळुंखे, संदीप सातपुते, पोकॉ अजय बाविस्कर, आकाश माळी, सुनील पाटील, अभिजीत पाटील,  गिरीश सोनवणे, अनिल राठोड यांच्या पथकाने केली असून, पोलिसांच्या या तत्परतेबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---