---Advertisement---
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील विकास कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद भास्कर भंगाळे (वय ५८, रा. भक्तराज निवास, विकास कॉलनी, प्रिमियर हॉटेलच्या मागे, जामनेर रोड, भुसावळ) हे पत्नीसह देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. ११ जून रोजी रात्री घर बंद करून ते बाहेरगावी गेले होते. १५ जून रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले.
घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमधील ड्रॉवरमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या ऐवजात चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे नाणे, एक सोन्याची अंगठी, चांदीचे कडे तसेच विविध मूल्यांच्या नोटांमधील रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा माल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रमोद भंगाळे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता.१६ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.









