---Advertisement---
भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय विवाहित महिला प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. तिच्या पतीची भारतीय वायू सेनेत नियुक्ती झायी असून ते सध्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात कार्यरत आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये अयाज ताज मदारे याने प्लॉट खरेदीच्या निमित्ताने पीडित महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून दिल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला तसेच त्याचे फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने कथित व्हिडिओंचा आधार घेत महिलेला ब्लॅकमेल केले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले तसेच तिच्याकडून सुमारे ३.०९ लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर महिलेने धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप केला आहे. मे २०२५ मध्ये तिला नागपूरजवळील परिसरात नेऊन काही धार्मिक विधी करण्यात आले आणि तिचे धर्मांतर झाल्याचा दावा करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यांची सत्यता अधिकृतरीत्या पडताळण्यात आलेली नाही. महिलेने काही दिवसांपूर्वी संपूर्ण घटना आपल्या पतीला सांगितल्यानंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार, खंडणी, धर्मांतरासाठी दबाव, तसेच संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अयाज ताज मदारे आणि अमीन शेख यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी हजर मौलाना याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.









