जारगाव- एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न; चोरटे फरार, 9 लाखांची रोकड वाचली; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल….!

---Advertisement---

 

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. बुधवारी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील कॅश मोटारीत घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. सदर घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जारगाव येथील एटीएममधील तब्बल 8 लाख 89 हजार 700 रुपये इतकी रोकड पोलीस वेळेत पोहोचल्याने रक्कम वाचली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे 3.30 ते 4:30 वाजेच्या दरम्यान जारगाव येथे स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये काही अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच हवालदार हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे पोहोचले असता एटीएम मशीन गॅस कटरने तोडण्यात आलेले होते. मशीनमधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट बाहेर काढून ते काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनात चढविण्याची तयारी सुरू होती. घटनास्थळी तीन तरुण उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांना पाहताच तिन्ही संशयितांनी वाहनात बसून तारखेडा, कजगाव, कोळगाव मार्गे धूम ठोकली.

संशयितांनी क्रेटा कारचा वापर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहनातून पळून गेल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, दिनेश पाटील यांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला. संशयितांचा माग काढत पोलिसांचे पथक धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत पोहोचले. मात्र अंधाराचा आणि वेगवान हालचालींचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विविध टोल नाक्यांवर वाहनाची माहिती प्रसारित केली. तसेच धुळे जिल्हा पोलीस, मध्य प्रदेशातील नियंत्रण कक्ष आणि इतर संबंधित यंत्रणांनाही संशयित वाहनाबाबत सतर्क करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, वाहनाच्या हालचाली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सदर घटनेबाबत भिमराव अंबादास बलखंदे (रा. छत्रपती संभाजी नगर) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास  पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय काळे हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---