दोंडाईचा परिसरात मान्सूनचे धुवाधार आगमन; पहिल्याच पावसात रस्त्यांना नदी-तलावाचे स्वरूप….!

---Advertisement---

 

दोंडाईचा शहर व परिसरात मान्सूनने दमदार हजेरी लावत सलग दोन दिवस पावसाची बरसात केली. २२ जून रोजी तुरळक स्वरूपात सुरू झालेला पाऊस २३ जून रोजी दुपारनंतर जोरदार स्वरूपात कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला चालना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. समाधानकारक पर्जन्यमानामुळे शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून कापूस, बाजरी, मका तसेच अन्य खरीप पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी सुरू केली आहे. कृषी तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांना पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा अधिक बळावल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामाबाबत सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्याच पावसात रस्ते जलमय….

मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसाचे स्वागत अनेक नागरिकांनी आनंदाने केले. काहींनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला, तर काहींना घर व दुकानांसमोर साचलेल्या पाण्यासह वाहून आलेला कचरा साफ करण्यात वेळ घालवावा लागला.

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः तलाव आणि लहान नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दुकानदार आणि रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

विशेषतः रावल नगर परिसरातील साईबाबा मंदिरालगतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या घरांसमोर पाणी साचले. पावसाच्या पाण्यासोबत घाण आणि कचरा वाहून आल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली. तसेच रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागली.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर प्रश्नचिन्ह?

पहिल्याच जोरदार पावसात शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अनेक भागांमध्ये गटारींचा अभाव आणि नाल्यांची अपुरी साफसफाई यामुळे पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या स्वच्छता आणि निचरा व्यवस्थेच्या कामांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांसाठी पाऊस आनंदाची बातमी घेऊन आला असला तरी दुसरीकडे शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---