---Advertisement---
जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भोजे येथील निलेश नामदेव उभाळे विरोधात पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विलास बाबूलाल जाधव यांनी दि.१ जून २०२६ रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोणतीही मध्यस्थी केलेली नसताना आरोपी निलेश उभाळे यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करत ५० हजार रुपयांची मागणी केली.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संभाषणांचे मोबाईल रेकॉर्डिंग फिर्यादीकडे उपलब्ध असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचे समजते.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही पैशांसाठी त्रास देत धमक्या दिल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता 3 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार हे करीत आहेत.









