---Advertisement---
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून या प्रक्रियेअंतर्गत एकूण 16 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत 61 जणांनी तब्बल 91 अर्जांची खरेदी केली होती. मात्र अंतिम टप्प्यात केवळ 16 उमेदवारांनीच प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले. प्रमुख राजकीय पक्षांपैकी भारतीय जनता पक्षाकडून एक उमेदवार तर शिवसेना (ठाकरे गट) कडून एक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
आता अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यावर अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होईल. त्यामुळे या निवडणुकीचे नेमके चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.









