---Advertisement---
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले आहे. भुसावळ येथील जिल्हा व तिसरे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी दिलेल्या निकालात आरोपीविरुद्ध हत्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. शिक्षेच्या मुद्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सोमवारी होणार असून आरोपीला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयासमोर 23 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचा निष्कर्ष नोंदविला.
ही घटना 16 ऑक्टोबर 2020 रोजी उघडकीस आली होती. बोरखेडा येथील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्यप्रदेशात गेले असताना घरात सविता (13), राहुल (11), अनिल (8) आणि सुमन (6) ही चार मुले एकटी होती. सकाळच्या सुमारास शेजारी मुस्तफा शेख यासिन शहा यांनी घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून चौकशी केली. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आत प्रवेश केला असता चारही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
घटनास्थळी कुऱ्हाड आढळून आली होती. तसेच एका मुलीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसून आल्या होत्या. यानंतर रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान महेंद्र बारेला हा मुलांच्या कुटुंबाच्या परिचयातील असल्याचे समोर आले. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या भावंडांना जाग आल्याने प्रकार उघडकीस येण्याची भीती त्याला वाटली. त्यानंतर आरोपीने चारही बहीण-भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
या क्रूर घटनेने त्यावेळी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता दोषसिद्धीनंतर न्यायालय आरोपीला कोणती शिक्षा सुनावते, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.









