---Advertisement---
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, घरगुती गॅसच्या किमती, स्मार्ट मीटर योजना तसेच बेरोजगारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जळगावात ‘धक्का मारो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
तसेच स्मार्ट मीटर योजनेवरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा दावा करत ही योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न, बेरोजगारी आणि विविध लोकहिताच्या मुद्द्यांवरही आंदोलनातून आवाज उठवण्यात आला.
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी देशभरात तीन टप्प्यांतील आंदोलनाची घोषणा केली असून त्याअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील ‘धक्का मारो आंदोलन’ जळगावात पार पडले. आंदोलनाची सुरुवात स्वातंत्र्य चौक, गांधी उद्यान येथून करण्यात आली. सहभागी कार्यकर्त्यांनी वाहनांसह रॅली काढून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे, राज्य कोषाध्यक्ष विनोद अडकमोल आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरे यांनी केले.









