टाकरखेडा, नांद्री व झाडी येथील तीन अल्पवयीन मुलीं व तरुणी बेपत्ता; अमळनेर शहरातील १९ वर्षीय युवती हरवल्याची नोंद, पोलिसांचा तपास सुरू..

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ मे रोजी घडल्या असून, अमळनेर शहरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. या सर्व घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टाकरखेडा येथील नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीची आई २८ मे रोजी सकाळी वीटभट्टीवर कामासाठी गेली होती. दुपारी घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. नातेवाईक व गावात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. गावातील काही व्यक्तींनी कुणाल नामक तरुणाने मुलीला पळवून नेल्याची माहिती दिल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर अल्पवयीन मुलगी पोलिसांना मिळून आल्याची माहिती आहे.

नांद्री येथील १५ वर्षीय मुलगी २८ मे रोजी रात्री कुटुंबीयांसमवेत झोपली होती. मात्र २९ मे रोजी पहाटे ती घरातून बेपत्ता झाल्याचे आढळून आले. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. गावातील काही नागरिकांनी रोहित नामक तरुणाने तिला पळवून नेल्याचे सांगितल्याने मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच झाडी येथील १७ वर्षीय मुलीला २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

शहादा येथील मच्छी बाजार परिसरातील रहिवासी असलेली १९ वर्षीय तरुणी अमळनेर येथील म्हाडा कॉलनीतील नातेवाईकांच्या घरातून २८ मे रोजी सकाळी ११ ते २९ मे रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

टाकरखेडा व नांद्री येथील प्रकरणांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत असून, बेपत्ता तरुणीच्या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत. सर्व घटनांचा अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---