दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटपाचा मुहूर्त ठरला १ जून रोजी शाळांमध्ये होणार वितरण; प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

---Advertisement---

 

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच इतर शालेय अभिलेखांच्या वाटपाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. मंडळाच्या निर्देशानुसार संबंधित साहित्याचे वितरण १ जून रोजी शाळांना करण्यात येणार असून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल जाहीर होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही विद्यार्थी व पालक गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत होते. विशेषतः अकरावी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रतीक्षाकाळ संपणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक वेगाने मार्गी लागणार आहे.

मंडळाच्या पत्रानुसार १ जून रोजी सकाळी ११ वाजता विभागीय मंडळांकडून मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना गुणपत्रके, प्रमाणपत्रे व संबंधित अभिलेखांचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर शाळांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे वितरित करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवेश प्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी शाळांनी वितरणाचे नियोजन वेळेत पूर्ण करावे, तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून प्रतीक्षेचा अखेर पडदा पडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---