पिंपरखेडच्या मारुती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी; ६५ हजारांचा ऐवज लंपास, भाविकांमध्ये तीव्र संताप…!

---Advertisement---

 

धरणगाव रस्त्यावरील जागृत देवस्थान म्हणून परिचयाच्या असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानातल्या मासोळ्या असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मौल्यवान ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

९ जून रोजी पहाटे हा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे पारोळा शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. भाविकांच्या श्रद्धास्थानाला लक्ष्य केल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धरणगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर धरणगाव रस्त्यालगत हे मारुती मंदिर आहे. दि. ८ जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील हे देवाची सेवा आणि दैनंदिन पूजा आटोपून मंदिर बंद करून आवारातच झोपले होते. याच शांततेचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून मारुतीच्या मूर्तीच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट आणि कानात परिधान केलेल्या चांदीच्या मासोळ्या अत्यंत शिताफीने चोरून नेल्या.

पुजारी आसाराम पाटील हे नेहमीप्रमाणे ९ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता पूजेसाठी उठले. त्यांनी मंदिराचे दरवाजे उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला असता, त्यांना मारुती रायाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि मासोळ्या गायब असल्याचे दिसून आले. देव्हाऱ्यात झालेली अस्ताव्यस्तता आणि चोरीचा हा गंभीर प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पारोळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली आहे. पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---