---Advertisement---
शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी फायटर आणि लाठ्या-काठ्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश भगवान गिरासे (वय २३, रा. जावदे तर्फे बोरद, ता. शहादा, जि. नंदुरबार) हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा युवक आणि साक्षीदार गणेश लखेसिंग गिरासे हे गावातील दीपक नवलसिंग गिरासे यांच्या घराच्या मागील बाजूला सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी त्यांची मोटारसायकल थांबवली. काही समजण्याच्या आतच आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमा करून फिर्यादी व साक्षीदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील लोखंडी फायटर आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत दोघांना जखमी केले. तसेच ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी ऋषीकेश गिरासे याने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात दीपक नवलसिंग गिरासे, शामसिंग नवलसिंग गिरासे, जितेंद्र नवलसिंग गिरासे, महेंद्र नवलसिंग गिरासे, प्रतीक दिलीपसिंग गिरासे, नितीन संजयसिंग गिरासे, नवलसिंग बादलसिंग गिरासे आणि अन्य एक (सर्व रा. जावदे तर्फे बोरद, ता. शहादा) अशा ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १८९, १९०, १९१ (२), १९१ (३), ११८ (१), १२६ (२), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सणसिंग ठाकरे करत आहेत.









