---Advertisement---
देशासह राज्यात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असतानाच आता अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुज खाडीतील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र कच्चे तेल आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने अनेक ठिकाणी घरगुती गॅसच्या उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही शहरांमध्ये नागरिकांनी गॅस सिलिंडर मिळत नसल्याने एजन्सीसमोर रांगाही लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले केले की, भारतात घरगुती एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नेहमीप्रमाणे वितरण प्रक्रिया सुरू असून पुरवठ्यात कोणताही अडथळा आलेला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या संदेशांपासून सावध राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली असली तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात सरकारकडून कोणतीही नवीन वाढ करण्यात आलेली नाही. सध्या मुंबईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर ९१२.५० रुपये असून दिल्लीमध्ये ९१३ रुपये, कोलकाता येथे ९३९ रुपये, चेन्नई येथे ९२८ रुपये, अहमदाबाद येथे ९२० रुपये तर भोपाळ येथे ९१८ रुपये दर कायम आहेत.
एकंदरीत जागतिक तणावामुळे ऊर्जा क्षेत्रात चिंता निर्माण झाली असली तरी भारतातील स्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









