---Advertisement---
लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारी आणि दगडफेकीत झाल्याची घटना तालुक्यातिल शिरूड दिगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद दिनेश ठाकरे (वय ३२, रा. टाकरखेडा, जि. धुळे) हे आपल्या नातेवाईकांसह शिरूड दिगर येथे मेहुणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. ९ मे रोजी रात्री १०:५० च्या सुमारास नवरी मुलीसोबत नातेवाईक नाचत असताना, नवरदेवाचा काका सरदार जगन्नाथ कोळी याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून सरदार कोळी याने फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण केली आणि ‘तुम्हाला पाहून घेईल’ अशी धमकी दिली.
हळदीचा कार्यक्रम आटोपून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक इको गाडीने (क्र. MH-39-AJ-2768) जात असताना, शिरूड चौफुलीवरील आकाश हॉटेलसमोर सरदार कोळी आणि त्याच्यासोबत असलेल्या ५ ते ७ इसमांनी दुचाकी व मारुती व्हॅनने येऊन गाडी अडवली. यावेळी संशयितांनी गाडीवर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटून फिर्यादीचा शालक प्रमोद रवींद्र यशीगर याच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी विनोद ठाकरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी सरदार जगन्नाथ कोळी व इतर ५ ते ७ अनोळखी इसम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









