---Advertisement---
अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकतास येथील विश्वास नारायण पाटील (वय ४४) हे शेतात काम करून भर उन्हातून घरी आल्यानंतर अचानक अस्वस्थ झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निमगूळ येथील सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९) या मेहंदी कार्यक्रमासाठी रेल्वेने अमळनेर येथे येत असताना रेल्वे स्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रचंड उष्णतेमुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाठ (वय ३५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. तसेच एलआयसी कॉलनीतील रमेश जगन्नाथ चौधरी आणि ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचाही उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.









