---Advertisement---
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. सावर, कुडले आणि इच्छागव्हाण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाची भीती निर्माण झाली असून, शेतकरी आता तिळ आणि इतर पिकांच्या काढणीत व्यस्त झाले आहेत.
गेल्यावर्षी उन्हाळ्यात मी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचाही मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी सध्या तीळ, हिरवे मूग आणि इतर उन्हाळी पिकांची काढणी करण्यासाठी शेतात दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. विशेषतः तिळ पिकाच्या काढणीला या भागात वेग आला आहे.
तीळ हे अत्यंत कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे तेलबिया पीक मानले जाते. साधारण ८५ ते ९० दिवसांत हे पीक तयार होते. महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात तिळाची लागवड केली जाते. मात्र सध्या उन्हाळी तिळाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे अधिक कल वाढला आहे.
या परिसरात काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या तिळाचे उत्पादन घेतले जाते. उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन तसेच वाळूमिश्रित पोयटा जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते. मात्र ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, त्या ठिकाणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
तिळाची पाने पिवळी पडून गळू लागल्यानंतर काढणीला सुरुवात केली जाते. त्यानंतर शेतकरी तिळाच्या पेंढ्या बांधून त्या उन्हात वाळवतात. नंतर पारंपरिक पद्धतीने काठ्यांच्या सहाय्याने झोडपून तिळाचे दाणे वेगळे केले जातात.









