---Advertisement---
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा शहर व तालुक्यातील सर्व पक्षीयांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चौकशी करुन सुनावणी घेण्यात यावी व संशयित आरोपीस महिनाभराच्या आतच मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार दीपा जेधे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका ६५ वर्षीय भीमाशंकर प्रभाकर कांबळे या विकृत मनोवृत्तीच्या संशयिताने अवघ्या ४ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. या घटनेत ही पीडित बालिका उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती. ती शुक्रवारी दुपारी घराच्या परिसरात खेळत असतांना संशयीत आरोपी भीमाशंकर कांबळे याने तिच्यावर अत्याचार करुन खून करुन तो पळून गेला. या प्रकरणातील संशयित आरोपी भीमाशंकर कांबळे यांच्या विकृत आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याचा निषेध करून अशाच प्रकारच्या अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन त्यांचा खून करण्याच्या घटना राज्यात दुर्दैवाने वाढल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नसरापूर घटनेची तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चौकशी करुन सुनावणी घेण्यात यावी आणि शक्य तेवढ्या लवकर ३० दिवसाच्या आत या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देऊनही या बालिकेचा जीव परत येणार नसला तरीही यामुळे समाजात एक चांगला संदेश जाईल आणि असे भ्याड आणि माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य कोणी करणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले. येथील सर्व समावेशक समाजाच्या तीव्र निषेधाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्या अशा आशयाचे निवेदन सर्व समाज व राजकीय पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.









