---Advertisement---
देशभरातील गॅस ग्राहकांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा बदल समोर आला आहे. केंद्र सरकारने आता ‘एक घर, एक कनेक्शन’ या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून, घरात एकाच वेळी एलपीजी सिलिंडर आणि पीएनजी कनेक्शन ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार, ज्यांच्या घरात पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG कनेक्शन उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना अनुदानित घरगुती LPG सिलिंडर ठेवता किंवा रिफिल करता येणार नाही. सरकारने या संदर्भात नवीन आदेश जारी केले असून, तेल कंपन्या आणि वितरकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयामागे वाढते जागतिक ऊर्जा संकट आणि इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेला ताण हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सरकार आता उपलब्ध गॅसचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलत आहे.
नवीन नियमानुसार, एका घराला आता फक्त एकच सुविधा मिळणार आहे. एलपीजी सिलिंडर किंवा पीएनजी कनेक्शन. दोन्ही सुविधा एकत्र ठेवणे नियमबाह्य मानले जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात आधीपासून PNG सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी एलपीजी कनेक्शन जमा करावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारचा दावा आहे की, या निर्णयामुळे अनुदानित एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल आणि ज्या भागांमध्ये अजून पीएनजी पोहोचलेले नाही, त्या गरजू कुटुंबांना गॅस सहज उपलब्ध होईल. दरम्यान गॅस कंपन्यांनी अशा घरांचा शोध सुरू केला आहे, जिथे LPG आणि PNG दोन्ही सुविधा वापरल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता LPG कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.









