---Advertisement---
पारोळा शहरातील जुन्या धुळे-जळगाव रस्त्यावरील ‘साई ट्रॅक्टर’ शोरूमसमोर आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिपिक देविदास प्रल्हाद नाईक (५३, रा. गोपाळनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा अंत झाल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास नाईक हे त्यांच्या होंडा शाईन मोटारसायकलने (एम.एच.१९. ई.जे. ५७४४) जात असताना, समोरून येणाऱ्या अशोक लेलैंड दोस्त या मालवाहू गाडी (एम. एच. १९. सी. वाय. ३२८९) ने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे सहकारी शरद भाईदास सरदार व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी कुटीर रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचे जावई नंदू भावडू जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मालवाहू गाडीचा चालक राजेंद्र बाबुराव शिंदे (रा. आसोदा, जि. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत देविदास नाईक हे बाजार समितीत लिपिक म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बाजार समि तीच्या कर्मचारी वर्गात आणि गोपाळनगर परिसरात दुः खाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.









