---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात बेलसवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 1 वर्षीय बालक जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीवरील गजानन पाटील आणि अश्विनी पाटील या पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघे रावेर तालुक्यातील कोचूर गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पती-पत्नीला मृत घोषित केले, तर 1 वर्षाच्या बालकावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रकवर दगडफेक करत काचा फोडून तीव्र संताप व्यक्त केला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.









