गिरणा प्रकल्पातून दोन हजार क्यूसेक बिगरसिंचनचे चौथे आवर्तन, शेतकऱ्यांनी शेती पंप बंद ठेवण्याच्या सूचना

---Advertisement---

 

Jalgaon News : जिल्ह्यात सद्यस्थितीत वाढत्या उन्हाची तीव्रता पहाता बऱ्याच ठिकाणी विहिरींची पाणीपातळीत घट झाली आहे. तसेच प्रकल्पांमधील पाणीसाठा देखील सरासरी ४५.८८ टक्क्यांपर्यत आला आहे. गिरणा नदीकाठच्या गावासह अन्य परिसरात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या चाळीसगाव पाचोरा आणि भडगाव नगरपरिषदेकडून पाण्याच्या आवर्तनाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या निर्दे शानुसार व कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार गिरणा प्रकल्पातून रविवारी पेयजलासाठी बिगर सिंचनाचे दोन हजार क्यूसेकचे चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर असे तीन मोठे प्रकल्पांसह १४ मध्यम आणि ९६ लघू प्रकल्पात दशलक्ष घनमीटर अर्थात टिएमसीनुसार सरासरी टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यात सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पातून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तीन सिंचनाचे व दोन पेयजलाचे बिगरसिंचन असे पाच आवर्तने देण्यासह पाणी आरक्षण करण्यात आले आहे. आतापर्यत मार्चअखेरदरम्यान सिंचनाची तीन आवर्तने देण्यात आली असून आवश्यकता व मागणीनुसार बिगरसिंचनाची पेयजलासाठीची दोन आवर्तने शिल्लक आहेत.

दोन हजार क्यूसेकचे बिगरसिंचनाचे आवर्तन

सद्यस्थितीत गिरणा नदीपात्र ब-याच ठिकाणी कोरडेठाक असून विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे बऱ्याच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. गिरणा प्रकल्पांतर्गत चाळीसगाव भडगाव आणि पाचोरा नगरपरिषदांसह अन्य १४० ग्रामीण पाणीपुरवठा योजना या जलसाठ्यांवर अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्पातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे अंतर्गत चाळीसगांव, नगरपरिषद भडगाव व पाचोरा यांच्या मागणीनुसार बिगर सिंचन पाणीवापरासाठीचे १५०० क्यूसेकचे चौथे आवर्तन रविवार सकाळी सोडण्यात आले आहे. तर दुपारनंतर पाणीप्रवाहात वाढ करण्यात येवून २००० क्यूसेकचा प्रवाह गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना सूचना

गिरणा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी आवर्तन फक्त बिगर सिंचन वापराकरिता असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावेत. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विनोद पाटील व चाळीसगाव प्रकल्प अभियंता, विजय जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पात ४५.८८ टक्के उपयुक्त जलसाठा

जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर ४०.७८, गिरणा ३८.१९ आणि वाघूर ७४.७१ असा सरासरी ४७.६७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यात गिरणा प्रकल्पातून २००० क्यूसेकचा प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच १४ मध्यम प्रकल्पापैकी मन्याड २५.०६, बोरी २.९७. भोकरबारी १.७२. सुकी ७७.५२. अभोरा ७०.७६, अग्नावती १९.०२. तोडापूर २७.४९, हिवरा १७.४३. मंगरूळ ४६.९६, बहुळा ३१.८७, मोर ६८.६६, अंजनी ३२.३४. गुळ ६६.५९, आणि शेळगाव बॅरेज २२.९४ असा सरासरी ७०५.४९ दशलक्ष घनमीटर नुसार २४.९१ टिएमसी अर्थात ४५.८८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

पाणीसाठा मर्यादीत

  • जिल्ह्यात वाढत्या उन्हाची तीव्रता पहाता बरेच जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा मर्यादीत स्वरूपात आहे. मान्सून सुरू होण्यासह प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक होण्यास किमान तीन ते चार महिन्याचा कालावधी असून उपलब्ध पाणसाठा पेयजलासाठीच आरक्षीत आहे. उपलब्ध पाणीसाठा वर आलेले पाणी आवर्तनानुसार पाणी प्रवाह मर्यादीत असून पुढचे आवर्तन मे अथवा जूनच्या मध्यावर आवश्यकतेनुसार सोडण्यात येईल. नागरिक तसेच तालुकावासियांनी पाण्याचा अपव्यय टाळत वापर जपून करावा.
    रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव.

राज्यात पाण्याच्या नियोजनावर बारकाईने लक्ष

  • राज्यात एवढं तापमान कधीच नव्हतं तेवढं तापमान सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेचे उष्णतेची झळ बसते आहे.. प्रकल्प मधील पाण्याचे प्रचंड वेगाने बाष्पीभवन होत आहे. राज्यात अनेक प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे. अनधिकृत पंपाद्वारे उपसा होत असेल तर त्यावर कारवाईच्या सूचना संबंधीत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. आगामी मान्सूनदरम्यान सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी असून ९४ टक्के पर्यंत पाऊसमान असेल ही शक्यता लक्षात घेता पाणीसाठ्याचा जपून वापर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या काळात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढण्याची शक्यता असून प्रकल्पांमधील पाणीसाठा पुरेसा आहे असे असले तरी सप्टेंबर पर्यंत तो काटकसरीने पुरवावा यासाठीचे शासन प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.
    गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री जळगाव.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---