इराणने जप्त केले भारतात येणारे मालवाहू जहाज, एकूण तीन जहाजांवर गोळीबार व कारवाई

---Advertisement---

 

तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा काळ दोन आठवड्यांनी वाढवल्यानंतर काही तासांतच बुधवारी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हल्ला करून दोन जहाजे ताब्यात घेतली. यात गुजरातला जाणाऱ्या मालवाहू जहाजाचा समावेश आहे. ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझमधील जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताचा ध्वज लावलेल्या दोन जहाजांवर हल्ला झाल्यामुळे इराण आणि भारतातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पनामाचा ध्वज असलेले एमएससी फ्रान्सेका आणि लायबेरियाचा ध्वज असलेले ईपामिनोंडास ही दोन जहाजे आता आयआरजीसीच्या ताब्यात असून, त्यांना इराणमध्ये नेण्यात आल्याचे वृत्त इराणमधील सरकारी दूरचित्रवाणीने दिले आहे. ग्रीकच्या मालकीची युफोरिया या तिसऱ्या नौकेलाही लक्ष्य करण्यात आले. ही नौका सध्या इराणच्या किनाऱ्यालगत अडकून पडली आहे.

सागरी वाहतुकीच्या माहितीनुसार, ईपामिनोंडास गुजरातच्या मुंद्रा बंदराच्या दिशेने जात होते. हे जहाज दुबई येथून येत होते. या जहाजांकडे आवश्यक परवानगी नव्हती आणि त्यांनी नेव्हिगेशन प्रणालीत फेरफार करून सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला, असा दावा इराणी नौदलाने केला.

इराणच्या ३४ जहाजांनी फोडला अमेरिकेचा वेढा

होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण आहे. नाकेबंदीची रणनीती प्रचंड यशस्वी ठरली आणि इराणसोबत एखादा अंतिम करार होईपर्यंत ही निर्बधबंदी उठवली जाणार नाही, असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, इराणशी संबंध असलेल्या किमान ३४ जहाजांनी अमेरिकीचा वेढा फोडला, अशी माहिती समोर आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---