---Advertisement---
नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी मोठी केली आहे. या प्रकरणातील संशयित आणि कथित मास्टरमाइंड मानली जाणारी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगर शहरातून अटक करण्यात आली आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि संभाजीनगर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही अटक केली.
गेल्या २७ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे तसेच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील एका वसाहतीत कुटुंबासह राहत होती. तिच्या अटकेसाठी साध्या वेशातील वीसहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून त्या परिसरात पाळत ठेवून होते. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही या मोहिमेत समावेश होता.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे विशेष मोहीम राबवत निदाचा माग काढला. तपासात निदा खानने मागील महिनाभरात नाशिक, ठाणे, भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध शहरांमध्ये वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. मास्टरमाईंड निदा खानच्या अटकेनंतर तिच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. एसआयटी आता तिच्या संपर्कातील इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियावरील हालचालींचाही तपास करणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निदा खान आणि इतर आरोपींनी पीडित महिलेला धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेला बुरखा देणे, इस्लाम धर्मावरील पुस्तके देणे तसेच मोबाईलमध्ये धार्मिक अॅप्लिकेशन इन्स्टॉल करून धार्मिक व्हिडिओ, युट्यूब लिंक आणि रिल्स पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर पीडित महिलेला नमाज पठण, हिजाब आणि बुरखा परिधान करण्याबाबत मार्गदर्शन केल्याचाही आरोप तपासात समोर आला आहे. या सर्व गोष्टींसाठी निधी किंवा मदत कुणाकडून मिळाली? गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खानला आश्रय कुणी दिला? तसेच कंपनीतून बदली झाल्यानंतरही ती इतर आरोपींच्या संपर्कात होती का? या सर्व मुद्द्यांवर आता सखोल तपास सुरू आहे.









