विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडली; यावल वनविभागाची धडक कारवाई

---Advertisement---

 

यावल वनविभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध कोळसा वाहतुकीवर मोठी कारवाई करत विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक जप्त केली. ही कारवाई 21 मे 2026 रोजी रात्री यावल-किनगाव रस्त्यावर गस्तीदरम्यान करण्यात आली.

यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडचे पथक गस्त घालत असताना वाहन क्रमांक MH 19 CX 4149 या ट्रकवर संशय आल्याने ती थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा भरलेला आढळून आला. संबंधित वाहतुकीबाबत पास किंवा परवान्याची विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. यावेळी चालक घाबरून ट्रक घटनास्थळीच सोडून पसार झाला.

वनविभागाने सदर ट्रक जप्त करून यावल वनविभागाच्या मुख्य विक्री केंद्रात जमा केली असून पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41(2) व 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक सौरीष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत संजय इंडे, सुधीर पटणे, योगेश मुंडे, सरला भोंगरी तसेच वनसेवकांच्या पथकाचा सहभाग होता.

जप्त करण्यात आलेली ट्रक नेमकी कुणाची आहे? कोळसा कुठून आणण्यात आला होता? ट्रकमध्ये किती कोळसा होता? तसेच विनापरवाना वाहतुकीला कोणाचे संरक्षण होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, पुढील तपासात याबाबत नेमकी माहिती समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---