---Advertisement---
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जागावाटपाबाबत राज्य पातळीवर प्राथमिक बैठक झाल्याची माहिती दिली. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी उद्यापासून राज्यस्तरावर निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती जागा जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव विधान परिषद मतदारसंघाची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक स्तरावर तयारीलाही सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना अधिक उधाण आले असून संभाव्य उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.
आता महायुतीच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय काय होतो आणि जळगावची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.









