शहाद्यात डंपरच्या धडकेत तरुण ठार; डंपर चालकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतला…!

---Advertisement---

 

शहादा-दोंडाईचा रोडवरील संविधान चौक परिसरात एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा अंत झाला. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुण भोमदान कुशालदान चारण (वय २७, मूळ रा. जोधपूर, राजस्थान; सध्या रा. शांती विहार, मोहिदा रोड, शहादा) हा १० मे २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने जात होता. शहादा-दोंडाईचा रोडवरील गोकुळधाम कॉलनीच्या बोर्डासमोर, खेतिया बायपासकडून येणाऱ्या एका अज्ञात डंपरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने ही धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, डंपरचे चाक भोमदान यांच्या डोक्यावरून गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या प्रकरणी मृताचा भाऊ मुलदान कुशालदान चारण (वय ३०, रा. शांती विहार, शहादा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १०६(१), ३२४ (४) (५) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार डंपर चालकाचा शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---