जामनेर तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास पहूरजवळील हिवरी–हिवरखेडा फाट्याजवळ घडली. या प्रकरणी आरोपी तरुणास पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्यास आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास बापू रोहाम (पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेचा सविस्तर तपशील
नेरी येथील रहिवासी असलेली तरुणी फर्दापूर येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. एका तरुणाने तिच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचे सांगत वारंवार लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्यामुळे आरोपी संतप्त झाला. शनिवारी सकाळी आरोपीने तरुणीचे अपहरण करून तिला पहूर जवळील हिवरखेडा फाट्या जवळील एका शेतात नेले. तेथे तिच्या डोक्यावर दगडाने वारंवार घाव घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
उपचार व वैद्यकीय स्थिती
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार करून सुमारे २७ टाके घालून रक्तस्राव थांबवला. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांची कारवाई
घटनेनंतर पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पहूर पोलीस ठाण्याच्या पथकासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने जप्त करून तपासासाठी पाठविले आहेत. आरोपी श्रीकृष्ण देवचंद जाधव (रा. चारू तांडा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) विरुद्ध अपहरण, खुनाचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ व धमकी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकतर्फी प्रेमातून वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत पालक, सामाजिक संस्था व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तरुण-तरुणींमध्ये जागरूकता निर्माण करून अशा गुन्ह्यांना आळा घालावा तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे