---Advertisement---
जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची घट झाल्याने सराफ बाजारात चर्चेला उधाण आले आहे.
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात सोमवारी जळगाव येथील सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटी वगळता सुमारे 1 लाख 56 हजार रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत. तर चांदीचे दर जीएसटी वगळता 2 लाख 56 हजार रुपये प्रति किलो इतके नोंदवले गेले आहेत. जीएसटीसह विचार केला असता सोन्याचा दर 1 लाख 60 हजार 680 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 63 हजार 680 रुपये प्रति किलो इतका पोहोचला आहे.
तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. विशेषतः गोल्ड ETF मधील गुंतवणूक कमी होणे, गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात नफा वसुली होणे आणि अमेरिकन डॉलर मजबूत होणे ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









