नंदुरबार जिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळीमा; पोटच्या नवजात मुलीला सोडून आई पसार…!

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्या नऊ महिन्यांच्या नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर, तिचे पालनपोषण करण्याऐवजी तिला रुग्णालयातच सोडून पळ काढला आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
मिळालेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी  रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील होळ येथील रहिवासी असलेली  महिला प्रसूती कळा येत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला तातडीने प्रसूती कक्षात दाखल केले. दुपारी ४:१२ वाजेच्या सुमारास तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने वॉर्ड क्रमांक १२७ मधील काचेच्या पेटीत (NICU) उपचारासाठी ठेवण्यात आले, तर मातेला वॉर्ड क्रमांक ४१ मध्ये हलवण्यात आले होते.
  
६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत बाळाची आजी त्याला दूध पाजण्यासाठी वॉर्डात येत होती. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास बाळ रडत असल्याने कर्तव्यावर असलेल्या परिचारिका दिशा सौंदाणे या मातेला पाहण्यासाठी गेल्या असता, ती बेडवर मिळून आली नाही. सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाळाची आजीदेखील रुग्णालयातून बेपत्ता झाली होती. रात्रीच्या शिफ्टला आलेल्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता, माता आणि तिची नातेवाईक मिळून आले नाहीत.

नवजात बाळाला असुरक्षित स्थितीत सोडून पळून गेल्याप्रप्रकरणी परिचारिका दिशा नरेंद्र सौंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संशयित माता  आणि तिच्या आईविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३८०/२०२६ आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सदर महिलेची ओळख पटली असल्याची माहिती मिळाली आहे.
    
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सध्या तरी या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---