जळगावात गॅसच संकट…! आठवडाभरापासून पाचही गॅस पंप बंद; रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ….!

---Advertisement---

 

जळगाव शहरात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या आठवडाभरापासून पाचही एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंपन्यांकडून वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे पंपचालकांसह रिक्षाचालकांनाही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

जळगाव शहरातील इच्छा देवी परिसर, ट्रान्सपोर्ट नगर आणि तोलकाटा या भागांतील एकूण पाचही एलपीजी गॅस पंपांवर सध्या गॅस पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे सर्व पंप बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे पंप चालकांना नाईलाजास्तव पंप बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे त्यांच्या रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दुसरीकडे, या परिस्थितीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक रिक्षा पंपांवरच उभ्या ठेवून चालकांना परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. रोजंदारीवर चालणाऱ्या या व्यवसायावर थेट परिणाम झाल्याने रिक्षाचालकांमध्ये संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे.

“गॅसच मिळत नसेल तर आम्ही काम कसं करायचं? आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,” अशी व्यथा रिक्षाचालकांनी व्यक्त केली. काहींनी तर पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.

गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी पंप चालक आणि रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगावातील एलपीजी संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, सामान्य नागरिकांपासून ते रिक्षाचालकांपर्यंत सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---