“अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!” विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ; सरकारवरही गंभीर आरोप…!

---Advertisement---

 

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गंभीर आणि राजकीय रंग घेऊ लागले आहे. या प्रकरणावरून राज्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत खळबळजनक दावा करत राज्य सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की, या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील पुराव्यांवरूनही वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “अशोक खरातचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यातील महत्त्वाचा पेन ड्राईव्ह अजूनही समोर का आणला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “तो पेन ड्राईव्ह समोर आला, तर मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्र्यांची विकेट जाऊ शकते,” असा दावा त्यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांच्या मते, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि काही प्रभावशाली राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. त्यामुळे सत्य बाहेर येऊ नये यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली. रुपाली चाकणकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, अजूनही त्या अनेक पदांवर कार्यरत आहेत. सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधत, “त्यांनी ठरवल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नाही, उलट त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच राष्ट्रवादीमध्ये सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेणारे ‘बॉस’ असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) देखील वडेट्टीवार यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. “सरकार अर्धवट माहिती देत आहे आणि उर्वरित गोष्टी लपवत आहे. SIT च्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, यावर आमचा अजिबात विश्वास नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना आणि मित्रपक्षांना वाचवण्याचा प्रयत्न करतील, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या सर्व आरोपांमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गडद होत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या आरोपांवर राज्य सरकार आणि संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---