---Advertisement---
अकोला जिल्ह्यातील अकोली बुद्रुक येथे भारतीय सैन्यातील जवानाच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सुशील दिलीप तेलगोटे असे मृत जवानाचे नाव असून, ते सुट्टीवर गावी आले असताना ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील तेलगोटे हे काही दिवसांच्या रजेवर घरी आले होते. मंगळवारी रात्री ते सासरवाडीतून परतल्यानंतर त्यांच्या मित्राचा फोन आला. त्यानंतर जय मुरेकर नावाचा मित्र त्यांना घेऊन गेला. “अर्ध्या तासात परत येतो” असे सांगून ते घरातून बाहेर पडले, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, सुशील यांनी शेवटचा फोन करून “मी जेवण करून येतो” असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुशील आणि त्यांच्या मित्रांमध्ये दारूच्या नशेत काही कारणावरून वाद झाला. या वादातून गोलू ठाकूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान २७ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून, आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. सुशील यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









